Monday 26 March 2018

पुणे मुंबई: भाग २

पुणे मुंबई प्रवास, रस्ता मार्गे असो किंवा रेल्वेने असो, दोन्ही प्रकारे, सारखाच आनंददायी आहे. पुणे मुंबई: भाग १ मध्ये आपण बोर घाटातल्या लोहमार्गाच्या तिसऱ्या मार्गिकेने प्रवास करत निसर्गाचा आस्वाद घेतला. यानंतर अजून एकदा पुण्याला माझ्या चारचाकीने गेलो होतो. तेव्हा परत मुंबईला येताना केलेला हा प्रकाशचित्रणाचा उद्योग.

बहुतेकदा मी हा पुणे मुंबई प्रवास द्रुतगती मार्गाने करतो. पण या वेळेस जुन्या पुणे मुंबई मार्गाने गेलो, जरा निवांत गेलो आणि ३ - ४ तासांच्या प्रवासाला ८ तास लावले! आणि हे ठरवून केले!!

पुण्याचा पश्चिमी वाह्यवळण मार्ग अर्थात कात्रज देहूरोड मार्ग हा चिंचवडकडून येणाऱ्या 'राष्ट्रीय महामार्ग ४८'ला देहूरोड रेल्वे स्थानकापासून ३-४ कि. मी. अंतरावर मिळतो. पुण्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांतून येताना या बाह्यवळण मार्गाने येऊन द्रुतगती महामार्गावर किंवा जुन्या पुणे मुंबई मार्गावर जाता येते. द्रुतगती महामार्गावर जाण्याच्या जागेपासून 'राष्ट्रीय महामार्ग ४८'अर्थात जुना पुणे मुंबई महामार्ग साधारणपणे ३ कि. मि. अंतरावर आहे. खालील चित्रात हा परिसर दिसत आहे.


'गुगल अर्थ'कडून साभार


आता ठरवलंच होतं जुन्या महामार्गाने जायचं तर कॅमेराही सज्ज होताच! तळेगावचा पथकर नाका अर्थात toll booth येण्याआधी नजरेत भरते ती डावीकडच्या डोंगरावरची भली थोरली गणपती बाप्पाची मूर्ती!     




सुखकर प्रवासासाठी बाप्पाचे आशिर्वाद! Exif: f: 8, 1/125 ISO 100
या प्रकाशचित्रात मूर्तीच्या मागून सूर्यप्रकाश असल्यामुळे मूर्तीची पुढच्या बाजूवर सावली दिसत आहे. दुपारनंतर या मूर्तीचे प्रकाशचित्र घेतले तर हा परिणाम दिसणार नाही. तर बाप्पाचे आशिर्वाद घेऊन पुढचा प्रवास चालू केला. तळेगाव, वडगाव आणि कान्हे या गावांनंतर येणारा कामशेत बाह्यवळण मार्ग म्हणजे एक छोटासा घाट आहे.  माझ्या आठवणीप्रमाणे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला हा बाह्यवळण मार्ग वापरात आला. त्याआधी कामशेत गावातून अतिशय चिंचोळ्या रस्त्याने जावे लागे. गावातून जाणारा महामार्ग पुढे पुणे मुंबई लोहमार्गाला समांतर जातो. आणि शेजारून वाहते, ज्या नदी काठी ज्ञानेशाची समाधी लागली होती ती इंद्रायणी.  पण त्यांची समाधी आळंदीला लागली होती, कामशेतला नाही, हे आपल्याला सर्वांना माहीत आहेच!

पुढे या बाह्यवळण मार्गावरच्या घाटाचा उतार चालू होण्याआधी एके ठिकाणी थांबून ही प्रकाशचित्रे घेतली.



लोहमार्ग आणि त्याच्या शेजारी इंद्रायणी नदी Exif:f:11 1/250 ISO 100




इंद्रायणी नदीवरील एक पूल Exif:f:10 1/250 ISO 100
भर दुपारी ही प्रकाशचित्रे घेतली असल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश होता म्हणून aperture एवढे छोटे ठेवावे आणि जोराच्या वाऱ्यामुळे हलणारी झाडांची पाने स्थिर वाटावीत यासाठी shutter speed एवढा जास्त ठेवणे आवश्यक असते .

इथून समोरच दिसणाऱ्या पण काही कि. मि. दूर असलेल्या एका डोंगरावर खुपसाऱ्या पवनचक्क्या आहेत, जिथे कदाचित विद्युत निर्मिती होत असावी.




समोरच्या डोंगरावरच्या पवनचक्क्या Exif: f:9 1/320 ISO 100




समोरच्या डोंगरावरच्या पवनचक्क्या Exif: f:9 1/160 ISO 100

या दोनपैकी पहिल्या प्रकाशचित्रातील डोंगराच्या बऱ्याच मोठया भागावर झाडे नाहीत. त्यामुळे तिथून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करणे आवश्यक असते आणि shutter speed वाढवून ती कमी करता येते.


पुढे मळवलीजवळ रस्त्याच्या उजवीकडे कार्ले लेणी असलेला डोंगर दिसतो.



कार्ले लेणी Exif: f:10 11/125 ISO 100
इथे डोंगराचा काही भाग गडद आणि काही भाग फिकट आहे. त्यामुळे या दोन्ही भागांतून परावर्तित होणारा उजेड समप्रमाणात कॅमेरात पकडला जावा म्हणून shutter speed जास्त ठेवावा लागतो. आणि यात दिसणाऱ्या इमारती कॅमेरापासून सरळ रेषेत मोजले तर अंदाजे २.५ कि. मि. अंतरावर आहेत, त्या स्पष्ट दिसण्यासाठी aperture छोटे ठेवावे लागते.

पुढे लोणावळ्यात जाण्याआधी वळवण गावाजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बससाठी थांबा आहे.



NH 4 या थांब्यावरील बस आणि प्रवासी Exif: f: 10 1/320 ISO 100
इथे थेट डोक्यावर सूर्य तळपत असल्यामुळे कॅमेरात येणारा प्रकाश मर्यादित ठेवण्यासाठी aperture एवढे छोटे ठेवावे लागते आणि प्रवाशांचे चालणे freeze होणे आवश्यक असते, त्यासाठी shutter speed जास्त ठेवावा लागतो.

थोडे पुढे गेल्यावर हे एक अप्रतिम दृष्य पाहायला मिळाले!



वात्सल्य! Exif: f:8 1/25 ISO 100
या दूध पिणारे हे वासरू सतत आपली शेपटी हलवत होते, ती हालचाल दिसणे अपेक्षित असेल तर shutter speed अजून कमी ठेवावा लागेल. ही गाय आणि तिचे गोंडस वासरू काहीसे सावलीत उभे आहे, अशा वेळेस पुरेसा उजेड कॅमेरावर यावा यासाठी aperture थोडे मोठे ठेवावे. इथे "कॅमेरावर उजेड" असे लिहिले आहे, त्याचा 'image sensor वर पडणारा उजेड" हा अर्थ आहे.

लोणावाळ्याच्या सुप्रसिद्ध V P S High Schoolच्या बाहेर कुंपण भिंतीवर शाळेचे काही शिक्षक आणि विद्यार्थी छान चित्रे काढत होते.



"झाडे लावा झाडे जगवा"




"स्वच्छ भारत सुंदर भारत! एक कदम स्वच्छता की ओर!"




"जल है तो कल है!"
या भित्तीचित्रांमधले संदेश किती समर्पक आहेत! ही तीनही प्रकाशचित्रे mobile कॅमेरावर घेतली आहेत, त्यामुळे shutter speed, ISO आणि aperture यांची निवड माझ्या हातात नव्हती म्हणून ते इथे लिहिले नाही. 

पुढे लोहमार्गावर पादचारी पूल आहे ज्यावरून लोणावळ्याच्या बाजारपेठेत जाता येते.




पादचारी पुलावरून दिसणारा मुंबई पुणे लोहमार्ग

हे प्रकाशचित्रंही mobileवरचे आहे म्हणून Exif Data लिहिला नाही. रस्तामार्गे लोहमार्ग ओलांडायचा पूल यात दिसत आहे. खालील प्रकाशचित्रात या पुलावरील वाहने दिसत आहेत.




लोहमार्गावरील पुलावरचा ट्रक Exif: f:10 1/320 ISO 100

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाचा काही भाग लोणावळ्याच्या तुंगारली भागात आहे. तुंगारली गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर १९३० च्या दशकात बांधलेले तुंगारली धरण आहे. या धरणाकडे जाणारा रस्ता द्रुतगती महामार्गाखालून जातो.



द्रुतगती मार्गावरील ट्रक Exif: f:10 1/250 ISO 100
वरच्या दोन प्रकाशचित्रांपैकी पहिल्यामध्ये shutter speed जास्त असल्यामुळे ट्रक एका जागी थांबल्यासारखा दिसत आहे. याला freezing motion असे म्हणतात. तर दुसऱ्या प्रकाशचित्रात shutter speed थोडा कमी केल्यामुळे ट्रकचा वेग जाणवत आहे. इथे shutter speed  अजून कमी असता तर ट्रकचा वेग आणखी प्रकर्षाने जाणवला असता.

नंतर लहानपणीच्या आठवणी जाग्या करत लोणावळ्यात दोन अडीच तास फिरून झाल्यावर मुंबईच्या वाटेला लागलो. आधी ठरवल्यानुसार लोणावळा ते खोपोली या प्रवासाचे चलचित्रण अर्थात video shootingही केले. यासाठी माझा mobile phone गाडीच्या काचेवर चिकटवता येईल असा एक mobile holderवर अडकवला आणि phone चा FLIGHT MODE चालू केला जेणेकरून चलचित्रणात बाधा येऊ नये आणि call आला तर गाडी चालवण्यावरून लक्ष विचलीत होणार नाही. तसंही वाहन चालवताना mobile phoneचा वापर करूच नये!




वाटेत जिथे जिथे प्रकाशचित्रे घेण्यासाठी थांबलो, तिथे तिथे हे चलचित्रण तात्पुरते थांबवले आणि प्रवास पुढे चालू करताना पुन्हा चालू केले.

खंडाळा गावातून पुढे आले की उजवीकडील दरीच्या पलीकडे राजमाची किल्ला दिसतो. तुंगारली धरणावरून एक पायवाट या किल्ल्याकडे जाते. राजमाची किल्ला अनेक गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण आहे.





राजमाची किल्ला Exif: f:6.3 1/320 ISO 100
या प्रकाशचित्रातला खालचा काही नको असलेला भाग छाटला आहे म्हणजेच crop केला आहे. भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळे इथे shutter speed जास्त ठेवला. 

राजमाची किल्ला दिसतो म्हणून ज्या बागेचे नाव Rajmachi  Point असे ठेवले गेले, ती बाग रस्त्याच्या उजवीकडे रहाते आणि खोपोलीकडे जाणारा उताराचा घाटरस्ता सुरू होतो. इथे प्रकाशचित्रणासाठी थांबणे आवश्यकच असते! द्रुतगती मार्ग इथून फार छान दिसतो.




द्रुतगती मार्गाचे विहंगम दृष्य Exif: f:8 1/640 ISO 100


द्रुतगती मार्गाचे विहंगम दृष्य Exif: f:8 1/640 ISO 100
रस्त्यावरील गाड्या स्थिर दिसण्यासाठी एवढा जास्त shutter speed ठेवणे आवश्यक असते आणि दुपारची वेळ असल्यामुळे image sensorवर येणारा प्रकाश कमी करण्यासाठी aperture छोटे ठेवले. या दोन पैकी पहिल्या प्रकाशचित्रातील डोंगराच्या काहीसा मागे सूर्य असल्यामुळे त्या डोंगराचा दर्शनी भाग गडद आला आहे. सकाळच्या वेळी हा परिणाम होणार नाही.  

वरील चलचित्रात दर्शविल्याप्रमाणे जुन्या पुणे मुंबई महामार्गाने जाताना घाटातला काही भाग आपण द्रुतगती मार्गावर असतो आणि अडोशी बोगद्यानंतर साधारणपणे दोन कि. मि. अंतरावर खोपोलीसाठी द्रुतगती मार्ग सोडण्याची जागा आहे. इथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील एका पुलावर द्रुतगती मार्ग आहे. या परिसरात थांबून पुन्हा काही प्रकाशचित्रे घेतली. ही प्रकाशचित्रे जिथून घेतली तिथून बोर घाटाचे आणि खोपोली शहराचे दृष्य खूप छान दिसते!





अमृतांजन पूल Exif:f:8 1/160 ISO 100

ऐतिहासिक अमृतांजन पूल इथे दिसत आहे.  



द्रुतगती मार्गाचा काही भाग Exif: f:8 1/80 ISO 100

या प्रकाशचित्रात द्रुतगती मार्गावरून पुण्याच्या दिशेला जाणारे truck दिसत आहेत. 



पुणे मुंबई लोहमार्गावरील घाटातली तिसरी मार्गिका Exif: f: 9 1/200 ISO 100
पुणे मुंबई: भाग १ मध्ये ज्या लोहमार्गाच्या ज्या तिसऱ्या मार्गिकेचे वर्णन केले आहे त्यावरील पूल दिसत आहे. 

या तिन्ही प्रकाशचित्रांचे subjects खूप लांब अंतरावर आहेत. त्यामुळे प्रकाशचित्रे under exposed किंवा over exposed येणार नाहीत एवढी काळजी घेतली तरी पुरे असते. त्यासाठीच, भर दुपारची वेळ असल्यामुळे image  sensorवर येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी aperture छोटे ठेवले तरी पुरते. 

आता घाट संपत आला होता. आणि मुंबईतली रहदारीची वेळ सुरू होण्याआधी परत पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे camera आवरला आणि मार्गक्रमण चालू केले. पुणे मुंबई प्रवासाचे वर्णन करणाऱ्या या दोन्ही भागांमधली माहिती - प्रकाशचित्रणाबद्द्लची तांत्रिक आणि मार्गाची, आजूबाजूच्या जागांची माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करून हा प्रकाशचित्रणाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

दिवस पंच्याऐंशीवा पान पंच्याऐंशीवे 

मुलुंड मुंबई 
२६/०३/२०१८